भिल समाज विकास मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन; निष्पक्ष चौकशी व न्यायाची मागणी
एरंडोल । प्रशांत शिंदे | प्रतिनिधी
गुजरात राज्यातील डेडियापाडा मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी नेते चेतरजी वसावा यांच्याविरोधातील प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी भिल समाज विकास मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती देशातील विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २५ जून २०२६ रोजी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ आणि वृत्तांच्या आधारे संबंधित प्रकरणात राजकीय दबाव टाकला जात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात यावी, तसेच जबाबदार अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, चेतरजी वसावा यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी येत असून त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यांना न्याय मिळावा आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य तो दिलासा मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लक्ष्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड, राजधर सोनवणे, करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे, बादल ठाकरे, करण बेलदार, आकाश ठाकरे, अजय बेलदार, कुणाल अहिरे, दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वृत्तातील आरोप आणि मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. संबंधित प्रकरणाबाबत संबंधित यंत्रणा किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
