दोन आरोपी जेरबंद, एक विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; चोरीतील ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
देवदर्शनासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घरावर डल्ला • सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिसांची मजल • रोख रक्कम, सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त
धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव शहरातील घरफोडीच्या गाजलेल्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून रोख रक्कम, सोने आणि चांदीचा मिळून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धरणगाव परिसरातील घरफोडीच्या घटनेचा छडा लागला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या कुटुंबासह २३ मार्च २०२६ रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेण्यात आला. या प्रकरणी ३१ मार्च २०२६ रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर आणि सखोल तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. सुरुवातीला कोणताही ठोस धागादोरा मिळत नसतानाही पोलिसांनी गोपनीय माहिती यंत्रणा सक्रिय ठेवत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा माग काढला.
या तपासातून संदीप थोरात (वय २६) व कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण चौकशीत तिघांनीही सदर घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.
आरोपींकडून ६२ हजार रुपये रोख, ८९ ग्रॅम वजनाची सुमारे ३ हजार रुपये किमतीची चांदीची लगड तसेच ३.१२० ग्रॅम वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार तसेच विष्णू बिन्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
