जलजीवन मिशनअंतर्गत उभारलेल्या टाकीतून दोन वर्षांपासून पाणीपुरवठा नसल्याचा आरोप; चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील सुकवड गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आणि दोन वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि स्वाभिमानी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील विश्वनाथ-सुकवड ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत सुकवड गावात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीतून पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे टाकी पूर्ण होऊन दोन वर्षे उलटूनही गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि स्वाभिमानी क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
स्वाभिमानी क्रांती सेनेचे ॲड. संतोष जाधव यांनी निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान, पंचायत समितीचे उपअभियंता प्रताप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना संबंधित पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी टाकी हस्तांतरण प्रक्रियेत ग्रामपंचायतीचे बनावट सही-शिक्के वापरल्याचा आरोप केला. याबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपअभियंत्यांनी दिल्यानंतर सुमारे तासाभराने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी क्रांती सेनेचे ॲड. संतोष जाधव, किशोर बोरसे, अनिता सोनवणे, अर्चना साळवे, अनिकेत शिरसाट, अमर सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकृष्ट बांधकाम, बनावट सही-शिक्के आणि इतर अनियमिततेबाबतचे आरोप हे आंदोलनकर्त्यांनी केलेले आहेत. संबंधित आरोपांबाबत अधिकृत चौकशी सुरू होणे किंवा प्रशासनाची अंतिम भूमिका येणे बाकी आहे.
