Spread the love

भाजपच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेची भूमिका स्पष्ट; पीडितेला न्याय मिळावा, न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असल्याचे प्रतिपादन

गोंडगाव प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप • आमदार किशोर पाटील यांच्यावरील आरोप फेटाळले • न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप शक्य नसल्याचा दावा

भडगाव | प्रतिनिधी

गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणावरून भडगावमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

शिवसेनेचे नगरपरिषद गटनेते लखीचंद पाटील यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावत, गोंडगाव प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधीला न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

“या प्रकरणाचा आमदार किशोर पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेवर कोणाचाही प्रभाव पडू शकत नाही. त्यामुळे आमदारांवर करण्यात येणारे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून त्यामागे राजकीय हेतू आहे,” असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत, विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी संवेदनशील आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच, “गोंडगाव प्रकरणाला तीन वर्षे उलटल्यानंतरच भाजप नेत्यांना जाग कशी आली? या काळात ते कुठे होते?” असा सवालही उपस्थित केला.

लखीचंद पाटील यांनी पुढे सांगितले की, गोंडगाव प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा हीच शिवसेनेची ठाम भूमिका असून न्यायालयीन प्रक्रियेवर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पीडित मुलीच्या कुटुंबासोबत शिवसेना आणि पक्षाचे पदाधिकारी खंबीरपणे उभे राहतील व न्याय मिळेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, गोंडगाव प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, संवेदनशील प्रकरणावर राजकारण रंगले आहे. मात्र, या प्रकरणात सर्व संबंधित पक्षांकडून मांडले जाणारे दावे आणि आरोप न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत तपासले जाणार असून अंतिम निर्णय न्यायालयाकडूनच होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version