Spread the love

६ ते १० हजार रुपयांच्या वाढीव बिलांवर संताप; स्मार्ट मीटरची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी, दंड माफी आणि जुने मीटर बसवण्याची मागणी

स्मार्ट मीटरवरून नागरिक आक्रमक • वाढीव वीज बिलांविरोधात MSEB कार्यालयात आंदोलन • मीटर तपासणी व दंड माफीची मागणी • ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव | प्रतिनिधी :
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये होत असलेल्या कथित भरमसाठ वाढीविरोधात संतप्त नागरिकांनी गुरुवारी मटण मार्केट येथील महावितरण (MSEB) उपविभागीय कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. शासनाने स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात पारदर्शकता आणि अचूकता येईल, असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात मीटरचे युनिट्स अतिशय वेगाने नोंदवले जात असल्याने हजारो रुपयांची बिले आणि त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, घरात मोजकीच विद्युत उपकरणे असतानाही एका महिन्याचे वीज वापराचे युनिट्स २०० ते ५०० पर्यंत कसे वाढतात, असा सवाल उपस्थित केला. जुन्या मीटरच्या तुलनेत नवीन स्मार्ट मीटर दुप्पट-तिप्पट वेगाने रीडिंग घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. पूर्वी १ ते २ हजार रुपयांचे येणारे वीज बिल आता थेट ६ ते १० हजार रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वाढीव बिलांसोबत दंडामुळे संताप

वाढीव वीज बिलांमुळे आर्थिक ताण वाढला असतानाच महावितरणकडून थकीत रकमेवर आणि अन्य कारणांवरून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. “बिलच चुकीचे असेल तर त्यावर दंड कशासाठी?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांवर वीज बिलांचे वाढते ओझे असह्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

घोषणाबाजीने परिसर दणाणला

सकाळपासूनच परिसरातील विविध भागांतील महिला व पुरुष नागरिक मटण मार्केट येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर जमा झाले. वाढीव वीज बिलांच्या प्रती हातात घेऊन त्यांनी “स्मार्ट मीटर हटाओ, सर्वसामान्य वाचवा”, “अन्यायी वीज बिल रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता काही काळ कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • सध्या बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची त्रयस्थ (थर्ड पार्टी) संस्थेमार्फत तातडीने तपासणी करावी.

  • ६ ते १० हजार रुपयांची वाढीव व कथित चुकीची वीज बिले रद्द करून दुरुस्त करावीत.

  • अन्यायकारक दंडाची वसुली तात्काळ थांबवून दंड माफ करावा.

  • स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत.

अधिकाऱ्यांचे आश्वासन

आंदोलनाची तीव्रता वाढताच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचे निवेदन स्वीकारले. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल तसेच ज्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड अथवा रीडिंगबाबत समस्या आढळतील, त्यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी बिले दुरुस्त केली जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version