Spread the love

‘लाखाचे सात लाख’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी बोलावत लुटमार; मुख्य आरोपी अटक, दोन साथीदारांचा शोध सुरू

सोशल मीडियावर ‘इंडियन सेकंड करन्सी’च्या नावाखाली फसवणूक • आर्थिक लोभाचे आमिष दाखवून लुटमार • धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई • मुख्य आरोपी अटकेत, दोन फरार आरोपींचा शोध सुरू

धुळे | प्रतिनिधी :
इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा गैरवापर करून “इंडियन सेकंड करन्सी”, “एक लाखाचे सात लाख”, “दोन लाखाचे पंधरा लाख” अशा आकर्षक आमिषांच्या रिल्सद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची निर्जन ठिकाणी नेऊन लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनाळे व हेकळवाडी परिसरात काही तरुणांकडून सोशल मीडियाचा वापर करून ही गुन्हेगारी टोळी कार्यरत होती. आरोपी इन्स्टाग्राम व फेसबुकवर आकर्षक रिल्स पोस्ट करून “इंडियन सेकंड करन्सी”च्या नावाखाली कमी पैशांत जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. या आमिषाला बळी पडलेल्या व्यक्तींना संपर्क साधून व्यवहार दाखविण्याच्या बहाण्याने अजनाळे आणि हेकळवाडी परिसरातील निर्जन ठिकाणी बोलावले जात होते.

तेथे पोहोचल्यानंतर आरोपींकडून संबंधितांना हत्याराचा धाक दाखवत शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले जात होते. भीतीमुळे अनेक पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे धाडस केले नसल्याने या टोळीचे कारनामे बराच काळ सुरू असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यात आली. या संदर्भात १० जून २०२६ रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांच्याकडे सोपविण्यात आला.

तपासादरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुनिल ऊर्फ अविनाश शंकर भोसले (वय ४५) याला २७ जून रोजी ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत आणखी दोन साथीदार या लुटमारीत सहभागी असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून तपास सुरू आहे.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे आणखी किती गुन्हे केले आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी, प्रशांत राठोड तसेच पोलीस कर्मचारी रविंद्र सोनवणे, कुणाल शिंगाणे, महेंद्रसिंग गिरासे, भावेश झिरे आणि सुरेंद्र खांडेकर यांनी केली.

दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या आकर्षक ऑफर, करन्सी बदलून अधिक पैसे मिळवून देण्याच्या आमिषांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन धुळे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version