Spread the love

खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; पाळधी व परिसरातील वारकरी-प्रवाशांना मोठा दिलासा

आषाढीसाठी विशेष रेल्वे • पाळधीला अधिकृत थांबा • डीआरयूसीसी बैठकीतील मागणी मंजूर • खासदार स्मिताताई वाघ यांचा पाठपुरावा यशस्वी • वारकऱ्यांसाठी प्रवास अधिक सुलभ

धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील)

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–पंढरपूर विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या रेल्वेला पाळधी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आल्याने धरणगाव तालुक्यासह परिसरातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाची सातत्यपूर्ण मागणी आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिताताई उदय वाघ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी ही विशेष रेल्वे एकूण दोन फेऱ्या करणार असून, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

या निर्णयामागे धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. दि. २१ मे रोजी मुंबई सेंट्रल येथे झालेल्या डी.आर.यू.सी.सी. (DRUCC) बैठकीत सदस्य महेंद्र कोठारी यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे ठामपणे मांडली होती.

त्यानंतर खासदार स्मिताताई उदय वाघ यांनीही पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून या मागणीचा आग्रह धरला. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली. याशिवाय, महेंद्र कोठारी यांनी पाळधी रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला थांबा देण्याची केलेली मागणीही मान्य करण्यात आली.

पाळधी स्थानकावर थांबा मंजूर झाल्याने धरणगाव, पाळधी तसेच परिसरातील वारकरी, भाविक आणि इतर प्रवाशांना आता पंढरपूरकडे जाण्यासाठी जळगाव किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या निर्णयाचे धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने स्वागत करत खासदार सौ. स्मिताताई उदय वाघ, पश्चिम रेल्वे प्रशासन तसेच डी.आर.यू.सी.सी. सदस्य महेंद्र कोठारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. वारकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे पाळधी परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सर्व भाविक व प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, भविष्यातही प्रवाशांच्या सोयीसाठी अशाच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version