Spread the love

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, ड्रेस, रंगपेटी व शैक्षणिक साहित्याचे वितरण; ‘बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ – सुरज वाघरे

महात्मा फुले हायस्कूलमध्ये सामाजिक उपक्रम • गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप • पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराचा पुढाकार • शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील) :

धरणगाव शहरातील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांची शैक्षणिक वाटचाल अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, पत्रकार अविनाश बाविस्कर, सुरज वाघरे, रवी करोसिया, संजय सोनवणे, माजी हॉलीबॉलपटू चेतन वाघरे, माजी कुस्तीपटू नरेंद्र बिवाल, प्रल्हाद पचेरवार, संजय पचेरवार आणि सुजीत वाघरे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात १० शालेय ड्रेस, १० डझन वह्या, २० चित्रकला वह्या, २० रंगपेट्या, २० कंपास पेट्या तसेच २० पेन यांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी सुरज वाघरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे. आम्ही केलेली ही छोटीशी मदत तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. तुम्ही शिकून मोठे व्हा आणि शाळेसह कुटुंबाचे नाव उज्ज्वल करा. बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, पुस्तक पेढी, वृक्षारोपण मोहीम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. एन. कोळी यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version