रक्तदानासह मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळ्यात रक्ताचा तुटवडा • व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम • १५० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग • रक्तदानासह आरोग्य तपासणी शिबिर
धुळे | प्रतिनिधी :
धुळे शहर व जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी धुळे व्यापारी महासंघ आणि एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
धुळे जिल्ह्यातील विविध रक्तपेढ्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. ही गरज लक्षात घेऊन व्यापारी महासंघ आणि एबी फाउंडेशनने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
रक्तदानाबरोबरच नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्यांचाही लाभ उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, किशोर डीयालानी, दीपक लुल्ला यांच्यासह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, व्यापारी बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांनी अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
