बाजारपेठांमध्ये उघडपणे प्लास्टिकचा वापर सुरूच; मुख्य पुरवठादारांवर कारवाईची मागणी, मनपा आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी अशी नागरिकांची अपेक्षा
प्लास्टिकबंदीला हरताळ • भाजी बाजार, हॉटेल्समध्ये खुलेआम वापर • मुख्य सप्लायर्सवर कारवाईची मागणी • पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव | प्रतिनिधी (सोमेश मुळे)
पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली, तरी जळगाव शहरात या बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा, भाजी बाजार, हॉटेल्स तसेच किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांना सर्रास प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तू दिल्या जात असल्याने प्लास्टिकबंदी केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
फुले मार्केट, केंद्रीय बसस्थानक परिसर, गोलाणी मार्केट तसेच विविध उपनगरांतील भाजी बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना कोणतीही भीती न बाळगता प्लास्टिक पिशव्या देत आहेत. अनेक ग्राहक स्वतः कापडी पिशवी घेऊन येत नसल्याने आणि व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून विक्रेते बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचेही समोर येत आहे.
यामुळे शहरातील कचरा कुंड्या, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा प्लास्टिकचा कचरा साचू लागला असून पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महानगरपालिका अधूनमधून किरकोळ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करते; मात्र शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा पुरवठा करणाऱ्या मुख्य गोदामांवर किंवा सप्लायर्सवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. “जर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे, तर त्या शहरात येतात कुठून?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जोपर्यंत प्लास्टिकचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबविणे अशक्य असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. प्लास्टिकची निर्मिती, साठवणूक आणि वितरण करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून शहरातील प्लास्टिकचा अवैध पुरवठा रोखावा, अशी मागणी होत आहे. यासाठी बाजारपेठांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविणे, प्लास्टिकचा साठा करणाऱ्या गोदामांवर छापे टाकणे, संबंधितांवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जातात का, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
