Spread the love

वै. ह.भ.प. तुकाराम महाराज बोरगांवकर यांच्या प्रेरणेने सुरू असलेली वारी परंपरा कायम; पंचक्रोशीतील शेकडो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

१२१ वर्षांची गौरवशाली परंपरा • बोरगाव ते पंढरपूर पायी दिंडी रवाना • विठ्ठलनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण • पंचक्रोशीतील शेकडो वारकऱ्यांचा सहभाग

बोरगाव | प्रतिनिधी (विजय पाटील)

धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या १२१ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पायी दिंडी सोहळ्याला शनिवारी (दि. ४ जुलै) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. वै. ह.भ.प. तुकाराम महाराज बोरगांवकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही वारी परंपरा आजही अखंडपणे जोपासली जात असून, यंदाही शेकडो वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान केले.

ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गावातील नगरप्रदक्षिणेनंतर दिंडीची वाटचाल सुरू झाली. टाळ-मृदुंगाच्या निनादात, अभंग-भजनांच्या सुरावटीत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”च्या जयघोषाने संपूर्ण बोरगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यंदाच्या दिंडीचे नेतृत्व ह.भ.प. प्रभाकर नामदेव कंखरे हे दिंडीचालक म्हणून करीत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात दिंडी पुढे सरकत आहे. वारकरी टाळांच्या तालावर फुगड्या खेळत, अभंग गात आणि विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.

या ऐतिहासिक दिंडीत बोरगावसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. बोरगाव खुर्द, टोळी, धरणगाव, एरंडोल, विवरे, भालगाव, पातरखेडा, जळू, नांदखुर्द, कासोदा, आडगाव, पायसखेडा, सागवी, विटनेर, नंदगाव, भवरखेडा, राजवड, भोणे, लोणे, कंडारी, रोटवद आणि पाळधी आदी गावांतील वारकरी दिंडीत सहभागी झाले.

दिंडी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, सेवा आणि भक्तीचा संदेश देणारी जीवनसंस्कृती असल्याची भावना यावेळी अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी निघणारी ही ऐतिहासिक दिंडी बोरगावच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानली जाते. गेल्या १२१ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या परंपरेमुळे नव्या पिढीतही वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजत असून, विठ्ठलभक्तीचा संदेश घराघरांत पोहोचत आहे.

यंदाही “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामगजरात आणि संतांच्या अभंगांच्या सुरावटीत बोरगावची ऐतिहासिक दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version