क्रांतीनगरमध्ये रक्तदान शिबिर व वृक्षारोपण उत्साहात; पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा संदेश
ॲड. राजीव साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व महावृक्षारोपण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बोरघर/माणगाव | विश्वास गायकवाड
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त १ ते ७ जुलै या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि ॲड. राजीव साबळे हितचिंतक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरे आणि महावृक्षारोपण सप्ताहाचा संकल्प राबविण्यात येत असून, या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी माणगाव शहरातील क्रांतीनगर येथे क्रांतीनगर रहिवासी मित्र मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला, तसेच रक्तदानाद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला क्रांतीनगर रहिवासी मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. पंकज लक्ष्मण खामगावकर, उपाध्यक्ष मयूर गुरव, सचिव भूषण सिसोदे, कार्याध्यक्ष बळीराम मोरे, सहसचिव राजेंद्र मराठे, नगरसेवक अजित तार्लेकर, मोरे गुरुजी, नरेश राजपूत, आदर्श मोरे, राहुल पाटील, इंद्रनील पाटील, नागेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगाव सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयशंकर पांडे, प्रा. राजेंद्र आचार्य, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. माळी, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अमेय उभारे, फिजिशिअन डॉ. गांधी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनीही सहभाग घेतला. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की, रक्तदान आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, सप्ताहभर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
