रस्त्याची दुरवस्था, कचऱ्याचे ढिगारे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल; तातडीने दुरुस्ती व स्वच्छता मोहिमेची मागणी
सोनार गल्लीची बिकट अवस्था • चिखलामुळे अपघाताचा धोका • स्वच्छतेचा बोजवारा • ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप
ममुराबाद जन प्रतिनिधी गिरीश चौधरी
ममुराबाद ग्रामपंचायत हद्दीतील सोनार गल्लीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून, पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून वाहतूक धोकादायक बनली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच परिसरातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे रस्ता दुरुस्ती व स्वच्छतेची मागणी केली असल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोनार गल्लीतील रहिवाशांनी केली आहे.
