Spread the love

वर्षभराच्या कामकाजाचा आढावा; अंदाजपत्रकास मंजुरी, नवीन पुस्तके व नियतकालिकांबाबत वाचकांच्या सूचना

नशिराबाद | वार्ताहर

नशिराबाद येथील तालुका ‘ब’ दर्जाचे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेत संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी वर्षाच्या नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद आमोदकर होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी आणि सचिव ॲड. प्रदीप देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आमोदकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेचा उद्देश स्पष्ट केला.

सभेच्या सुरुवातीला मागील वर्षात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्याध्यक्ष जनार्दन माळी यांनी संस्थेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आणि प्रगतीचा सविस्तर अहवाल सादर केला.

यावेळी संस्थेचा वार्षिक जमा-खर्चाचा अहवाल तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सभेपुढे मांडण्यात आले. त्यास उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.

वाचनालय अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने नवीन पुस्तके, मासिके, पाक्षिके आणि दैनिकांची खरेदी करण्याबाबत वाचकांनी विविध सूचना मांडल्या. उपस्थित सदस्यांच्या समस्या व अडचणींवरही सविस्तर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच आगामी कालावधीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

सभेचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. कोष्टी यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रमोद आमोदकर यांनी केले. या बैठकीस वाचनालयाचे पदाधिकारी, सभासद आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता अल्पोपहाराने झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version