Spread the love

सकाळी ८ ते २ ऐवजी ७ ते १२.१५ वेळ करण्याबाबत सकारात्मक निर्देश; SIR आणि BLO कामांसाठी सोय होणार

जळगाव | प्रतिनिधी

शाळेच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेना, जळगाव यांच्या पदाधिकाऱ्यांनी जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शाळेची वेळ बदलण्याची मागणी केली.

शिक्षण विभागाच्या अलीकडील पत्रानुसार शाळेची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी २.०० अशी निश्चित करण्यात आली होती. ही वेळ शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच शालेय कामकाजासाठी गैरसोयीची असल्याचे संघटनेने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेनेच्या महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी SIR आणि BLO यांसारख्या निवडणूक विषयक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शाळेची वेळ इतर जिल्ह्यांप्रमाणे सकाळची ठेवण्याची विनंती केली.

या मागणीची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ शिक्षणाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून इतर जिल्ह्यांमध्ये लागू असलेल्या वेळेनुसार सकाळी ७.०० ते दुपारी १२.१५ अशी शाळेची वेळ निश्चित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, या निर्णयामुळे शालेय कामकाजाबरोबरच SIR आणि BLO संबंधीच्या जबाबदाऱ्याही अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या सकारात्मक हस्तक्षेपाबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेना, जळगाव यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version