Spread the love

नागरिकांचे निवेदन; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

संघरत्न सपकाळे । भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे कचऱ्याचे वाढते ढीग आणि भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. गावातील अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार प्रकाश सरदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी व प्रशासक सरपंच यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रमेशभाऊ खंडारे, उस्मान पठाण, पुंडलिक पाटील, मनोहर निगोते, डॉ. प्रमोद पाटील, सोमा बऱ्हाटे, प्रमोद झांबरे, सचिन जावळे, बी. आर. सरोदे आणि अरुण पाटील यांच्यासह दहा नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात गावातील कचऱ्याचे ढीग तातडीने हटवावेत तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पुढील १५ दिवसांत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी आणि भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version