Spread the love

झुरखेड्याचे सरपंच सुरेश पाटील यांच्या निवेदनावर हालचाल; बँकेच्या संचालक मंडळाच्या वैधतेबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण

जळगाव |  जगदीश सपकाळे । प्रतिनिधी ।

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या अपात्रतेसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीची सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेतली असून, या प्रकरणात विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

झुरखेडा (ता. जळगाव) येथील लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा गो. पाटील यांनी सहकार आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या निवेदनात बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला होता.

या निवेदनाची दखल घेत सहकार आयुक्त कार्यालयाने संबंधित प्रकरण विभागीय सहनिबंधक, नाशिक यांच्याकडे पाठविले असून, आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करून अर्जदाराला त्याबाबत कळविण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या वैधतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रात या विषयाची जोरदार चर्चा सुरू असून, विभागीय सहनिबंधक या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी राबविली जाते, याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सहकार आयुक्तांनी केवळ निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले असून, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुढील चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच संचालक मंडळाच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version