अभिवाचन, साहित्यचर्चा आणि मान्यवरांच्या उपस्थितीने रंगला वैचारिक मेळावा
मुंबई | मिलिंद मिरजकर
ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पाटील यांच्या ‘काळ आणि माणूस (बदलत्या समाजाचे चिंतन)’ आणि ‘पाथवे पोएम्स – जेंटल इंग्लिश व्हर्सेस फॉर क्वायट पाथवेज ऑफ लाइफ’ या इंग्रजी कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा रविवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला. अभिवाचन, साहित्यचर्चा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्य संमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सोळांकूरकर यांनी केले. प्रारंभी दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक नारायण जाधव आणि ज्येष्ठ साहित्यिक नारायण लाळे यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशनानंतर नारायण जाधव यांनी ‘साद प्रतिसाद’ आणि ‘काळ आणि माणूस’ या पुस्तकांतील निवडक लेखांचे प्रभावी अभिवाचन केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘गमन’ चित्रपटातील अभिनयासाठी सांस्कृतिक कलादर्पण रजनी पुरस्कार प्राप्त नारायण जाधव यांचा डॉ. अशोक पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
‘काळ आणि माणूस’ या पुस्तकाचा परिचय राजीव जोशी, तर ‘पाथवे पोएम्स’ या कवितासंग्रहाचा परिचय सतीश सोळांकूरकर यांनी करून दिला.
प्रमुख पाहुणे नारायण लाळे आणि प्रा. अशोक बागवे यांनी दिलीप पाटील यांच्या समाजाभिमुख व विचारप्रवर्तक लेखनाचे कौतुक करत अशा साहित्याची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले.
पुस्तकांवरील चर्चेत नारायण लाळे, चांगदेव काळे, सनिद पाटील, अनंत जोशी, प्रकाश पाटील, किरण येले, मिलिंद मिरजकर, मनीष पाटील, प्रकाश गोठणकर, विकास भावे आणि अशोक गंगावणे यांनी अभ्यासपूर्ण समीक्षा सादर करत साहित्यकृतींच्या आशय, शैली आणि सामाजिक संदर्भांवर परखड मते व्यक्त केली.
समारोपावेळी विनया पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सुजाता पाटील आणि निवृत्त वरिष्ठ सीमाशुल्क अधिकारी सुनील पाटील यांचे विशेष योगदान राहिले. छायाचित्रण रमेश पवार (सुरभी स्टुडिओ) यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अभ्यासपूर्ण चर्चा, प्रभावी अभिवाचन आणि साहित्यिकांच्या मुक्त संवादामुळे हा सोहळा साहित्य, संस्कृती आणि वैचारिक देवाणघेवाणीचा प्रेरणादायी उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
