Spread the love

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह; नाल्यांसाठी पाईप न टाकल्याचा आरोप, राष्ट्रीय भीमसेनेकडून उपोषणाचा इशारा

वाल्मीक जाधव । पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील पहान गावात मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गावातील प्राथमिक शाळेजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या तलाठी कार्यालयासमोर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेले पाईप न टाकल्यामुळे संपूर्ण परिसरात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आले असून, संबंधित अंदाजपत्रकात आवश्यक पाईप टाकण्याची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराने कामात मनमानी करत आवश्यक पाईप टाकले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत वारंवार संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या प्रकरणी तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक असल्यास रस्ता रोको आंदोलनही छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कामाची गुणवत्ता तपासावी, दोषी ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version