Spread the love

निगडीत पक्षाच्या माध्यमातून तर भक्ती-शक्ती चौकात वैयक्तिक उपक्रम; पालखी स्वागतावरून भाजपच्या अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगली

पालखी स्वागतावरून भाजपमध्ये दोन गट? • वारकऱ्यांसाठी स्वतंत्र अन्नदान कार्यक्रम • शहरात राजकीय चर्चांना उधाण

पिंपरी-चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. वारकरी बांधवांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमांवरून पक्षातील दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत असून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दि. ८ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन करणार आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे निगडी येथील मधुकर पवळे पीएमपीएमएल बसस्टॉप परिसरात भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या पुढाकारातून वारकरी बांधवांसाठी भव्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेचे सदस्य अमित गोरखे, महापौर रवी लांडगे आणि अनुप मोरे यांचे मार्गदर्शन असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सेवा उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान, वैद्यकीय मदत, औषधांचे वाटप, चहा-नाश्ता, रेनकोट, छत्री तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा विशेषतः दोन ट्रक केळी, २५० किलो बुंदी, राजगिरा लाडू, फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली असून हजारो वारकऱ्यांना सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, याच वेळी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्वतंत्रपणे वारकरी बांधवांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. एकाच पक्षाच्या वतीने पालखी मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र सेवा उपक्रम राबविले जात असल्याने हा केवळ सेवा उपक्रम आहे की पक्षातील अंतर्गत मतभेदांचे प्रदर्शन, याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक राजकीय वर्तुळात या घडामोडीकडे भाजपमधील दोन वेगवेगळ्या नेतृत्वगटांच्या शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. पालखीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत समीकरणे समोर आल्याची चर्चा अनेक कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये रंगली आहे.

यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घडामोडींवर कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. पक्षश्रेष्ठी या प्रकाराकडे केवळ स्थानिक पातळीवरील आयोजन म्हणून पाहतात की यामागील राजकीय संदेशाची दखल घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, दोन्ही ठिकाणी वारकरी बांधवांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक कार्यरत असून, पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, सेवा उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेली राजकीय चर्चा शहरातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला नव्या वळणावर नेणारी ठरते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version