अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे अंगणवाडीतील सेवा प्रभावित; शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी
संघरत्न सपकाळे । भुसावळ | प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त टाकण्यात आलेल्या BLO (Booth Level Officer) सहाय्यक पदाच्या नियुक्त्या तातडीने रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण तसेच BLO सहाय्यक म्हणून अतिरिक्त कामे करून घेतली जात आहेत. मात्र, विविध शासन निर्णय आणि संबंधित विभागाच्या निर्देशांनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारची योजना बाह्य कामे करून घेऊ नयेत, असे स्पष्ट नमूद असतानाही स्थानिक स्तरावर परस्पर नियुक्त्या करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समितीच्या मते, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर वाढत्या अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे केंद्रांतील नियमित कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी बालकांचे पोषण, आरोग्य सेवा, गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून BLO सहाय्यकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीचे राज्य निमंत्रक रामकृष्ण बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख चेतना गवळी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा चौधरी, रत्ना वाघ, मनीषा बारी, वैशाली तेलंग्रे, रेखा सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
