Spread the love

गणेश नगरातील रस्ते वर्षभरापासून पूर्ववत नाहीत; चिखल, अपघात आणि साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा नागरिकांचा आरोप

नशिराबाद (जळगाव) | प्रतिनिधी

नशिराबाद नगरपरिषदेच्या हद्दीतील गणेश नगर परिसरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते अद्याप पूर्ववत करण्यात आले नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत परिसरातील रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी ८ जुलै २०२६ रोजी नशिराबाद नगर परिषदेला निवेदन देत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, वर्षभरापूर्वी नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते अमृत योजनेच्या कामासाठी खोदण्यात आले. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाकडून रस्ते पूर्ववत करण्यात आले नसल्याने पावसाळ्यात परिसरात चिखल आणि पाणी साचत आहे. परिणामी वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यांवरील चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. परिसरात न्यू इंग्लिश स्कूल असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. चिखलामुळे विद्यार्थी घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

याशिवाय रस्त्यांवर पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीही नगरपरिषदेकडे अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भविष्यात गंभीर अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही देवेंद्र भंगाळे यांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करून पक्के करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version