Spread the love

‘तू नाना साळवेसोबत का राहतोस?’ म्हणत धारदार शस्त्राने हल्ल्याचा आरोप; जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील गायकवाड चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात निलेश देवरे, प्रकाश अहिरे आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल रावसाहेब कुशारे (वय ४०, रा. कलामंदिर, पारोळा रोड, धुळे) हे कॉटन मार्केट मार्गे वरखेडी रोडकडून येत असताना प्रकाश अहिरे, निलेश देवरे आणि त्यांच्या अन्य दोघा साथीदारांनी त्यांना अडविल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, “तू नाना साळवेसोबत का राहतोस?” असा जाब विचारत आरोपींनी अमोल कुशारे यांना मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या छातीवर वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अमोल कुशारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version