Spread the love

SIR मोहिमेला वेग • पाचोरा विधानसभा मतदारसंघाची उल्लेखनीय कामगिरी • बीएलओ साहेबराव चौधरी जिल्ह्यात प्रथम • उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांचे अभिनंदन

भुवनेश्वर दुसाने । पाचोरा । तालुका प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) – विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. होल (ता. पाचोरा) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) साहेबराव चौधरी यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मतदान यादी भाग क्रमांक १२८ चे एसआयआरचे काम १०० टक्के पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम हा टप्पा पूर्ण करण्याचा मान मिळविला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भूषण अहिरे यांच्या नियंत्रणाखाली १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी देऊन प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करत आहेत. तसेच एन्युमरेशन फॉर्म (Enumeration Form – EF) चे वितरण, संकलन आणि भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मोबाईल अॅपवर माहितीचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात सध्या ३५४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, सर्व अधिकारी नियोजित मुदतीत पुनरीक्षणाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर साहेबराव चौधरी यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय मानली जात आहे.

साहेबराव चौधरी यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान यादी भाग क्रमांक १२८ मध्ये एकूण ८८९ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ८८१ मतदारांना एन्युमरेशन फॉर्मचे वितरण, संकलन आणि डिजिटायझेशन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ८ मतदारांची ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण काम शंभर टक्के पूर्ण करून त्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी साहेबराव चौधरी यांचे अभिनंदन करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन इतर सर्व बीएलओंनीही विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम अचूक, गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या संबंधित बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version