निष्काळजी अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाईचा इशारा; पाचोरा तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचा सखोल आढावा
पंतप्रधान आवास योजनेच्या कामांना गती • अपूर्ण घरकुलांबाबत कठोर भूमिका • लाभार्थ्यांशी समन्वय वाढविण्याचे आदेश • निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जळगाव जगदीश सपकाळे । विशेष प्रतिनिधी ।
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या आणि अद्याप अपूर्ण असलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. कामात दिरंगाई, टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला.
पाचोरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी एस. एस. मुंडे तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पाचोरा तालुक्यातील गावनिहाय मंजूर, पूर्ण आणि अपूर्ण घरकुलांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पहिला आणि दुसरा हप्ता मिळूनही अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण का आहेत, याची कारणमीमांसा करण्यात आली. तसेच अतिक्रमण, जागेचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांमुळे रखडलेल्या घरकुलांच्या प्रकरणांवरही सखोल चर्चा करण्यात आली.
करिश्मा नायर यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्याशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचना दिल्या. महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून सर्व अडथळे दूर करून घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
घरकुलांच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळावा आणि प्रत्येक मंजूर घरकुल पूर्णत्वास जावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. लाभार्थ्यांनीही प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक कागदपत्रे व माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
