२२ अल्पवयीन मुली सुरक्षित सापडल्या; २०१८ पासूनच्या बेपत्ता प्रकरणांपैकी ९५ टक्के प्रकरणांचा उलगडा
जळगाव | जगदीश सपकाळे । प्रतिनिधी
घरातून निघून गेलेले, हरवलेले किंवा विविध कारणांमुळे कुटुंबापासून दूर झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जळगाव पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या मोहिमेदरम्यान ३१ मुले आणि ५ अल्पवयीन मुलींसह एकूण ३६ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच पोलिसांकडे नोंद असलेल्या २२ बेपत्ता अल्पवयीन मुलींचाही यशस्वी शोध लावण्यात आला.
महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार ८ ते २३ जून या कालावधीत जिल्हाभर ‘ऑपरेशन शोध-४’ राबविण्यात आले. या मोहिमेत आश्रयगृहे, स्वयंसेवी संस्था, रेल्वे स्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने तसेच कचरा गोळा करणारी किंवा भिक्षा मागणारी मुले आढळणाऱ्या ठिकाणी विशेष तपासणी करण्यात आली. संशयित मुलांची ओळख पटवून त्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली.
अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांतील २२ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय नोंद नसलेल्या ३१ मुलांसह ५ मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात २०१८ ते २०२६ या कालावधीत एकूण २,०२७ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यापैकी १,९२८ जणांचा म्हणजेच ९५.११ टक्के प्रकरणांचा यशस्वी छडा जळगाव पोलिसांनी लावला आहे. उर्वरित ९९ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तत्कालीन डीवायएसपी (गृह) प्रदीप ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
