Spread the love

भुसावळच्या खडका ब्रिजजवळ मध्यरात्रीची घटना; ११ हजार ८०० रुपयांची रोकड हिसकावली, इतर संशयितांचा शोध सुरू

भुसावळ | संघरत्न सपकाळे । प्रतिनिधी

भुसावळ शहरातील खडका ब्रिज परिसरात मध्यरात्री दोन तरुणांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करून ११ हजार ८०० रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांना अटक केली आहे.

फिर्यादी गणेश दीपक तायडे (वय २५, रा. कंडारी, ता. भुसावळ) हे ८ जुलै रोजी मध्यरात्री आपल्या मित्रासह घरी जात असताना खडका ब्रिजजवळ दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. संशयितांनी चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली.

या घटनेत फिर्यादीकडील ११ हजार रुपये आणि त्यांच्या मित्राकडील ८०० रुपये, असा एकूण ११ हजार ८०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे केशव सुनील भालेराव (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) आणि खुशाल शिवदास रुम (वय २०, रा. गडकरी नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version