४५० वृक्षांचे वृक्षारोपण; लोकसहभागातून १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प, धुळ्याला हरित शहर बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहराला पर्यावरणपूरक, हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या उद्देशाने आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या ‘हरित धुळे’ संकल्पनेला धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी कृतीची जोड दिली आहे. त्यांच्या पुढाकारातून नगावबारी येथील वनविभागाच्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, टेकडीचे हरित क्षेत्रात रूपांतर करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत पहिल्याच टप्प्यात टेकडीवर सुमारे ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील काळात या परिसरात १० हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला असून, पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रभावी नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या अभियानाला महापौर मायादेवी परदेशी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी या उपक्रमासाठी सातत्याने पाठपुरावा करत स्वखर्चातून तब्बल ६३७ खड्डे तयार करून दिले. त्यामुळे वृक्षारोपणासाठी आवश्यक प्राथमिक तयारी वेळेत पूर्ण होऊन अभियानाला गती मिळाली.
विशेष म्हणजे, हा उपक्रम कोणत्याही सरकारी निधीवर अवलंबून नसून वनविभागाच्या टेकडीवर लोकसहभाग, श्रमदान आणि पर्यावरण संवर्धनाच्या भावनेतून राबविण्यात येत आहे. स्वयंसेवक, नागरिक, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी झाले.
या अभियानात महानगरपालिकेचे पाटकरी साहेब, सर्व स्वच्छता निरीक्षक, दिनेश माळी, बाविस्कर भाऊ तसेच अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपणासोबतच प्रत्येक वृक्षाचे नियमित संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी सांगितले की, “नगावबारी टेकडीवर १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून धुळे शहराच्या पर्यावरणीय भवितव्यासाठी सुरू झालेली लोकचळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास धुळे शहराची ओळख हरित शहर म्हणून निर्माण होईल.”
धुळे शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नगावबारी टेकडीवरील हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही टेकडी हिरवाईने नटलेला आदर्श प्रकल्प म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
