वार्षिक लेखापरीक्षण अहवालास मंजुरी; उत्कृष्ट बचत गट, बँक सखी व ग्रामसंघांचा गौरव, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर मार्गदर्शन
संजय मोहिते शहादा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत शहादा तालुक्यातील पाडळदा येथील ‘प्रगती महिला प्रभाग संघ, पाडळदा’ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ८ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. प्रभाग संघाच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाबाई विक्रम पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि बचत गटांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देव मोगरा माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर “इतनी शक्ती हमें देना दाता…” या प्रार्थनेने सभेला सुरुवात करण्यात आली.
प्रभाग समन्वयक विलास पवार यांनी प्रभाग संघाच्या विविध उपक्रमांची प्रस्तावना मांडली. त्यानंतर प्रभाग संघाच्या लेखापाल प्रियंका किरमा वळवी यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. उपस्थित सदस्यांनी या अहवालाला सर्वानुमते मंजुरी दिली.
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे, प्रभाग समन्वयक योगेश पाटील आणि संदीप महाजन यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार आणि सामाजिक प्रगतीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ‘लखपती दीदी’ झालेल्या महिला सदस्यांनी आपल्या यशोगाथा सांगून इतर महिलांना प्रेरित केले.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आयसीआरपी, बँक सखी, नियमित कर्ज परतफेड करणारे स्वयं सहाय्यता बचत गट तसेच सामाजिक समावेशन, उद्योग-व्यवसाय आणि आर्थिक शिस्त जोपासणाऱ्या ग्रामसंघांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सभेला प्रभाग संघाच्या सचिव रोहिणी राजेश अहिरे, खजिनदार राजश्री माणिलाल पाटील, तालुका व्यवस्थापक ईश्वर जगदाळे, बीएम दिलीप बैसाने, किशोर बिरारे, सहकारी प्रभाग समन्वयक राजेश देवकर, योगेश कोळी, निखिल शिर्के, पुरुषोत्तम बागुल, भीमा कोळी, विद्या वसावे, सुचिता सूर्यवंशी तसेच उद्यम संस्थेच्या पूजा जगडे यांच्यासह प्रभागातील सर्व आयसीआरपी, बँक सखी, ग्रामसंघांचे पदाधिकारी आणि बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देवकर यांनी केले, तर दिलीप बैसाने यांनी आभार प्रदर्शन केले. ठरलेल्या विषयपत्रिकेनुसार सभा यशस्वीरित्या पार पडली.
