Spread the love

गणेश नगरातील ९.९६ लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट दर्जा, आर्थिक तफावत आणि पर्यवेक्षणाअभावी तक्रार

नशिराबाद: । धीरज सैतवाल जैन। विशेष प्रतिनिधी ।

नशिराबाद शहरातील गणेश नगर भागात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या कामाची जळगाव जिल्हा बांधकाम विभाग आणि नाशिक आयुक्त यांच्या तांत्रिक पथकाद्वारे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
गणेश नगर भागात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी ९,९६,९३६ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी कंत्राटदार शेख मोहसीन शेख सलीम खटिक यांना जीएसटी वजा करून ८,०१,२२४ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, या कामात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराचे मुख्य आरोप
निकृष्ट दर्जाचे साहित्य:* कंत्राटदाराने वापरलेले पेव्हर ब्लॉक अत्यंत कमी दर्जाचे आणि स्वस्त आहेत.
नियमबाह्य पीसीसी (PCC) काम:* ब्लॉक बसवण्यापूर्वी केलेले पीसीसीचे बेस काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे.
आर्थिक तफावत:* प्रत्यक्ष जागेवर २२ मीटर रुंदी आणि ३२ मीटर लांबी इतकेच काम झाले आहे. जर या कामाचे मूल्य बाजारभावानुसार काढले, तर ते केवळ ३,७५,००० रुपयांच्या घरात येते. म्हणजेच, शासकीय निधीचा मोठा अपहार झाल्याचा स्पष्ट आरोप तक्रारदाराने केला आहे.

पर्यवेक्षणाचा अभाव:* हे काम सुरू असताना किंवा पूर्ण झाल्यावर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा अभियंत्याने जागेवर जाऊन पाहणी (Inspection) केलेली नाही.
या कामाबाबतचे फोटो आणि इतर पुरावे अर्जासोबत जोडण्यात आले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी तक्रारदार देवेंद्र भंगाळे यांनी केली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी (जळगाव), नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हा बांधकाम विभागालाही पाठवण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version