व्यापारी भवनात प्रशासन, महावितरण व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर; नागरिकांनी समस्या व तक्रारींसह उपस्थित राहावे, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन
पाचोरा | भुवनेश्वर दुसाणे । विशेष प्रतिनिधी ।
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित तक्रारी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा प्रश्न, कृषी व घरगुती ग्राहकांच्या अडचणी, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील व्यापारी भवन येथे विशेष संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, मतदारसंघातील वाढत्या वीजविषयक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बैठकीत मतदारसंघातील वीजपुरवठा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेत विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांच्या वीज समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीस प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मालगावे, कृषी अधिकारी सुधाकर कराड, दीपक ठाकूर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, के. बी. अंजने तसेच महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तक्रारदार नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मतदारसंघातील वीजविषयक प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने संबंधित नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना व तक्रारींसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी केले आहे.
