उत्तमनगरातील घटना; जखमींवर उपचार, एरंडोल पोलिसांकडून तपास सुरू
डॉक्टर मयूर पाटील । एरंडोल । प्रतिनिधी
एरंडोल शहरातील उत्तमनगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा तसेच लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, एरंडोल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी सुमारे ४ वाजता फिर्यादी भीमा गोकुळ बरेला (वय ३२, रा. उत्तमनगर, एरंडोल) हे आपल्या भावासोबत परिसरातील किराणा दुकानाकडे जात असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे दिली.
या प्रकरणी सुरेश मांगीलाल बरेला, सुभाष उर्फ टकल्या कालूराम बरेला, राजू मांगीलाल बरेला आणि मांगीलाल बरेला (सर्व रा. उत्तमनगर, एरंडोल) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मारहाणीदरम्यान एका संशयिताने लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत फिर्यादीसह अन्य काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय ठाकरे करीत आहेत.
