Spread the love

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या उपक्रमाला प्रतिसाद; शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्याचा मार्ग मोकळा

गणेश वानखडे ।  पहूर / पिपंळगाव बु. | प्रतिनिधी

ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील पिपंळगाव बु. येथे नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना अधिकृत कामगार ओळखपत्रांचे (कामगार कार्ड) वितरण करण्यात आले. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत PK Skill Foundation यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या ओळखपत्रामुळे ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, त्यांची अधिकृत नोंद शासनाकडे उपलब्ध राहणार आहे.  कार्यक्रमात PK Skill Foundationच्या संचालिका अर्चना वानखेडे यांनी मोफत नोंदणी मोहिमेची माहिती देत कामगार कार्डाचे महत्त्व विशद केले. शासनाच्या विविध योजना, विमा संरक्षण, शैक्षणिक सुविधा आणि आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामसेवक राजेश म्हस्के यांनी ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची असल्याचे सांगितले. तर मा. सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ पाटील यांनी आरोग्य, शिक्षण, विमा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा तसेच अपघात विमा यांसारख्या योजनांचा लाभ या कार्डाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी जळगाव जिल्हा वेंडर गणेश वानखेडे यांनी अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र ऊसतोड कामगारांनी तातडीने मोफत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. सर्व पात्र कामगारांना टप्प्याटप्प्याने ओळखपत्रांचे वितरण करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला सरपंच सौ. कल्पना विकास पाटीलउपसरपंच भारत सुभाष मोहने, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.

कामगारांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या ऊसतोड कामगारांना आता शासनाकडून अधिकृत ओळख आणि हक्काच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाल्याची भावना व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version