Spread the love

दोन महिन्यांपासून ग्रामसेवक रजेवर; अतिरिक्त ग्रामसेवकांकडे स्वाक्षरी अधिकार नसल्याने कारभार खोळंबला • सीईओंना भेटून निवेदन देणार

एरंडोल | प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव ग्रामपंचायतीत गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ग्रामसेवक आजारी रजेवर असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिरिक्त ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांनी अद्याप स्वाक्षरीचे अधिकार स्वीकारले नसल्याने पाणीपुरवठा, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थ आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

गावात नव्याने टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. परिणामी नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार पसरण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासकाची नियुक्ती असली तरी त्यांच्याकडे आवश्यक आर्थिक व प्रशासकीय अधिकार नसल्याने विकासकामांचे प्रस्ताव, दैनंदिन कामकाज, पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीची कामे आणि इतर अत्यावश्यक प्रशासकीय निर्णय रखडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र आहे.

ग्रामस्थांनी या समस्येबाबत वारंवार एरंडोल पंचायत समितीकडे तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.

रिंगणगावात तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करावी तसेच रखडलेली विकासकामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

“रिंगणगाव ग्रामपंचायतीला ग्रामसेवक असूनही त्यांनी स्वाक्षरीचे अधिकार स्वीकारले नसल्याने संपूर्ण कारभार ठप्प झाला आहे. भर पावसाळ्यात पाणीगळतीमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.”
— भरत महाजन, ग्रामस्थ, रिंगणगाव

Share.
Leave A Reply

Exit mobile version