Spread the love

१८ कोटींची मूळ थकबाकी; त्यावर ७५ कोटींचे व्याज; ५२ कोटींच्या बेस प्राईजपासून सुरू होणार लिलाव

कासोदा (जळगाव) | विक्रांत पाटील

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील अवसायनात गेलेल्या ‘वसंत सहकारी साखर कारखाना लि.’ च्या विक्रीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (JDCC Bank) ई-लिलावाची (ई-ऑक्शन) जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ‘सरफेसी कायदा २००२’ अंतर्गत ही कारवाई केली जात असून, येत्या २३ जुलै २०२६ रोजी या कारखान्याचा ऑनलाईन लिलाव पार पडणार आहे.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, सर्वसामान्यांना समजेल अशी या लिलावाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे –

किती आहे थकीत कर्ज?

वसंत सहकारी साखर कारखान्याकडे ३० जून २०२६ अखेर मोठी थकबाकी आहे. यात १८२३.२० लाख रुपये (सुमारे १८ कोटी २३ लाख) मुद्दल आणि त्यावर ७५४०.८५ लाख रुपये (सुमारे ७५ कोटी ४० लाख) व्याज व इतर खर्च असा मोठा बोजा आहे. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढली आहे. (दैनिक गांवकरी वृत्त सेवा)

विक्रीस काढलेली मालमत्ता कोणती?

या लिलावामध्ये कारखान्याची तब्बल १०३.१९ हेक्टर जमीन, त्यावरील संपूर्ण बांधकाम, प्लांट आणि मशिनरी यांचा समावेश आहे. ही विक्री ‘जसे आहे जिथे आहे’ आणि ‘जे आहे ते आहे’ या तत्त्वावर केली जाणार आहे.

लिलावाच्या महत्त्वाच्या तारखा आणि रक्कम

* राखीव किंमत (बेस प्राईज): कारखान्यासाठी ५२८३.८१ लाख रुपये (सुमारे ५२ कोटी ८३ लाख) इतकी राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे.
* अनामत रक्कम (ईएमडी): लिलावात सहभागी होणाऱ्या इच्छुकांना ५२८.३८ लाख रुपये (सुमारे ५ कोटी २८ लाख) अनामत रक्कम म्हणून भरावे लागतील.
* मालमत्ता पाहणीचा कालावधी: इच्छुक खरेदीदारांना कारखान्याची पाहणी करण्यासाठी १० जुलै २०२६ ते २२ जुलै २०२६ या दरम्यान (सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत) वेळ देण्यात आला आहे.
* ई-लिलावाची तारीख: प्रत्यक्ष ऑनलाईन लिलाव २३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० या वेळेत पार पडेल. (गांवकरी न्यूज नेटवर्क)

लिलावात सहभागी कसे व्हावे?

ही ई-लिलाव प्रक्रिया ‘एमएसटीसी लिमिटेड’ (MSTC Ltd.) या संस्थेमार्फत राबविली जात आहे. लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुकांना एमएसटीसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेच्या सविस्तर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी https://www.mstcecommerce.com किंवा जळगाव जिल्हा बँकेच्या www.jdccbank.in या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

कर्जदारांना ३० दिवसांची नोटीस

बँकेचे प्राधिकृत अधिकारी भिकन वसंतराव वाघ यांनी या सूचनेत स्पष्ट केले आहे की, सरफेसी कायद्यानुसार कर्जदार आणि जामीनदार यांना ३० दिवसांची वैधानिक सूचना देण्यात येत आहे. त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी थकीत कर्जाची रक्कम (व्याज व खर्चासहीत) न भरल्यास, कारखान्याची मालमत्ता लिलावात विकली जाईल. तसेच, मालमत्ता विकूनही बँकेचे कर्ज न फिटल्यास उर्वरित रक्कम कर्जदारांकडून वसूल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (विक्रांत पाटील / दैनिक गांवकरी न्यूज नेटवर्क)

Share.
Leave A Reply

Exit mobile version