धीरज सैतवाल । नशिराबाद प्रतिनिधी
येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या नवीन वास्तूचा नामकरण सोहळा नुकताच अतिशय मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. भगवान आदिनाथ स्वामी ज्या ठिकाणाहून मोक्षगामी झाले, त्या पावन ‘अष्टापद’ तीर्थाच्या स्मृतीस वंदन करत, या नवीन वास्तूला अष्टापद – शांती विद्या भवन असे नामकरण करण्यात आले.
या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराज यांचे परम शिष्य परमपूज्य मुनिश्री १०८ कुंथू सागर महाराज आणि क्षुल्लक १०५ अटल सागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात आणि त्यांच्या शुभहस्ते या नवीन वास्तूचे नामकरण करण्यात आले. संतांच्या या उपस्थितीमुळे नशिराबाद येथील जैन समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
याप्रसंगी जैन समाजाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने हे भवन भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. या नवीन वास्तूच्या माध्यमातून भविष्यात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्ये सुरळीत पार पडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल जैन समाजाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले.
