Spread the love

आपसातील वादाचे विकृत रूप; ग्रामस्थांनी पाणी वापरणे बंद केले, दूषित पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय – ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

३० जूनची घटना • तीन विहिरी दूषित केल्याचा आरोप • ग्रामस्थांमध्ये भीती व संताप • ग्रामपंचायतीने कारवाई न केल्याची तक्रार

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) | प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील आदिवासीबहुल लालगोटा गावात अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आपसातील जुन्या वादातून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये मानवी विष्ठा आणि लघवी टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारानंतर ग्रामस्थांनी संबंधित विहिरींचे पाणी वापरणेच बंद केले असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी फासेपारधी समाजाच्या लालगोटा गावात आपापसातील वादातून गंभीर गुन्हा घडला होता. त्या घटनेचा राग मनात ठेवून ३० जून रोजी काही महिलांनी दोन खासगी विहिरी आणि ग्रामपंचायतीच्या एका विहिरीत मानवी विष्ठा व मूत्र टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या गावात खासगी मालकीची एक विहीर शासनाने अधिग्रहित केली असून, त्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही विहिरींसह आणखी एका विहिरीतही घाण टाकण्यात आल्याचा आरोप असल्याने ग्रामस्थांनी या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद केला आहे.

यामुळे गावातील बहुतांश नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना आता बंद अवस्थेतील हातपंपाचे दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. सुरक्षित पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

फासेपारधी समाजातील सामाजिक परंपरांमुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. समाजातील प्रथेनुसार, मानवी विष्ठा किंवा मूत्राचा स्पर्श झालेली व्यक्ती किंवा अशा पाण्याचा वापर करणाऱ्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित विहिरीच वापरणे बंद केले असून, परिणामी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

घटना घडून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दूषित विहिरींचा उपसा, निर्जंतुकीकरण किंवा पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था यापैकी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, खासगी विहिरीच्या मालकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ग्रामपंचायतीने अधिकृत तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे. या संदर्भात ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या गंभीर प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, दूषित विहिरींचे तातडीने निर्जंतुकीकरण करावे आणि गावाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी लालगोटा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version