शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल; उल्हासनगरमध्ये अभिनंदनाचा वर्षाव
पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान • शिक्षण, समाजसेवा, संस्कृती व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव • मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान
ठाणे | प्रशांत ल. ढोणे
उल्हासनगर येथील हनुमान व्यवस्थापक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळेचे अध्यक्ष डॉ. अनिल गणपत पावसे यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि संस्कारक्षम कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत ‘राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे उल्हासनगर शहरासह ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. देशभरातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट, मूल्याधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या निवडक शिक्षणतज्ज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार शंकरराव जगताप, स्विफ्ट एन लिफ्ट मीडिया ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश साबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. पावसे यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. अनिल पावसे यांनी गेली अनेक दशके शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा ध्यास घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. शिक्षणाबरोबरच समाजसेवा, साहित्य, संस्कृती, योग, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती या विविध क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा मिळाली असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. पावसे यांनी हा सन्मान विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि समाजातील सर्व सहकाऱ्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.
या यशाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांनी तसेच मित्रपरिवार, हितचिंतक आणि नागरिकांनी डॉ. पावसे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे उल्हासनगरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
