Spread the love

जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

चाळीसगाव | प्रतिनिधी

खान्देशातील अनुसूचित जाती समाजामध्ये सामाजिक ऐक्य, जागृती आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चारही जिल्ह्यांतील मूलनिवासी बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही परिषद सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव (जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत सामाजिक न्याय, संविधानिक हक्क, समाज संघटन, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक एकात्मता या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजातील युवक-युवती, महिला आणि समाजबांधवांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजातील विविध प्रश्नांवर सामूहिक विचारमंथन करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

बामसेफ महाराष्ट्र राज्याचे मुख्य राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे यांनी खान्देशातील सर्व मूलनिवासी बहुजन समाजातील बंधू-भगिनींना या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक ऐक्य आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

आगामी काळातील सामाजिक चळवळींना दिशा देणारी ही परिषद ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून खान्देशातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version