Spread the love

“वाढता खर्च सरकारला जड होतोय का?” असा सवाल; योजनेवरील खर्च २६ हजार कोटींवरून ३२ हजार कोटींवर गेल्याचा दावा

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या योजनेच्या खर्चावरून राज्य सरकारवर निशाणा साधत, “लाडक्या बहिणींवरील वाढता खर्च सरकारला जड होऊ लागला आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे यांनी दावा केला की, सरकारमधीलच काही व्यक्तींकडून लाडकी बहीण योजनेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी या योजनेसाठी सुमारे २६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, मात्र आता हा खर्च वाढून जवळपास ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

या वाढीमुळे सुमारे साडेसहा ते सात हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचा दावा करत रोहिणी खडसे यांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “लाडक्या बहिणींना दिले जाणारे आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्याबाबत सरकारची भूमिका काय आहे? वाढता खर्च सरकारला अडचणीचा ठरत आहे का?” असा सवाल केला.

दरम्यान, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनाही आवाहन केले. “महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी त्यांनी ठामपणे उभे राहावे आणि या योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी,” असे त्यांनी म्हटले.

रोहिणी खडसे यांच्या वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या निधी, लाभार्थी संख्या आणि आर्थिक भार या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version