Spread the love

दोन आरोपी जेरबंद; १४ हजारांची रोकड हस्तगत • सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई

अक्षद ट्रेडिंग किराणा दुकानातील चोरीचा छडा • २,०५९ भारतीय चलनी नोटा व नाणी जप्त • शिरपूर शहर पोलिसांची तत्पर कामगिरी

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर शहरातील अक्षद ट्रेडिंग या किराणा दुकानात झालेल्या चोरीचा उलगडा शिरपूर शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली १४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष मोहनलाल अग्रवाल (रा. बोहरी गल्ली, बालाजी मंदिराजवळ, शिरपूर) यांच्या अक्षद ट्रेडिंग या किराणा दुकानातून ८ जुलै रोजी रात्री ८.३० ते ९ जुलै रोजी सकाळी ९.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी १४ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी मतीन खलील तेली व मकसूद अख्तर मेहतर, दोघेही रा. लोहार गल्ली, शिरपूर, यांना ताब्यात घेतले.

दोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली १४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या रकमेमध्ये १००, ५०, २०, १०, ५, २ आणि १ रुपयांच्या एकूण २,०५९ भारतीय चलनी नोटा व नाण्यांचा समावेश आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

या पथकात पोलीस अंमलदार रविंद्र अखडमल, अतुल पाटील, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि मनोज महाजन यांचा सहभाग होता.

अवघ्या चार तासांत चोरीचा छडा लावत आरोपींना जेरबंद करण्याची शिरपूर शहर पोलिसांची ही कामगिरी गुन्हे उघडकीस आणण्यातील तत्परतेचे उदाहरण मानली जात असून, नागरिकांनीही पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version