तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सेवा दर्जा उंचवावा; डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष दक्षतेच्या सूचना
जळगाव | प्रतिनिधी (दि. १३ जुलै २०२६)
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक असून, आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सोमवारी (दि. १३ जुलै) आरोग्य विभागाची सर्वसाधारण आढावा बैठक पार पडली. यावेळी करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवांवर नियमित देखरेख ठेवून सुधारणा करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि इतर किटकजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. संशयित रुग्णांचे सर्वेक्षण, वेळेत निदान आणि उपचार यावर विशेष भर देण्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, किशोरींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याचे निर्देशही करिश्मा नायर यांनी दिले. पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन त्यांनी आरोग्य यंत्रणेला केले.
