पाळधी परिसरातील विशेष शिबिरांना पालकमंत्र्यांची भेट; १६ जुलैच्या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह सहभागी होण्याचे प्रतापराव पाटील यांचे आवाहन
पाळधी | जळगाव प्रतिनिधी (दि. १४ जुलै)
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत पाळधी परिसरात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आणि युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नियोजनातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र स्तरावर विशेष शिबिरे व घराघर संपर्क अभियान सुरू केले आहे.
एकही पात्र नागरिक मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची नोंद तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी परिसरातील विविध मतदान केंद्रांवर आयोजित विशेष शिबिरांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदार नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, १६ जुलै रोजी आयोजित विशेष शिबिरात पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती किंवा इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात स्थानिक पदाधिकारी, बूथस्तरीय कार्यकर्ते आणि स्वयंसेवक घराघर जाऊन नागरिकांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देत असून, विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत.
