मुदतबाह्य अन्नपदार्थ, अस्वच्छता आणि विनापरवाना उत्पादनावर कारवाई; अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तपासणी
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरात अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. १४ जुलै) विविध डेअरी व मिठाई व्यावसायिकांवर धडक कारवाई करत दोन आस्थापना तात्काळ बंद केल्या. तसेच दोन डेअरींमधून म्हशीच्या व गायीच्या दुधाचे चार नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत त्रिमूर्ती डेअरी, स्टेशन रोड आणि ओम डेअरी, वाडीभोकर रोड, धुळे या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी म्हशीच्या व गायीच्या दुधाचे प्रत्येकी नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधित आस्थापनांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, देवरे हॉस्पिटलजवळील एस. बालाजी स्वीट्स या आस्थापनाच्या तपासणीत मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवलेले असल्याचे आढळून आले. तसेच अस्वच्छता, अन्नपदार्थांवर माशांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापना तात्काळ बंद करण्यात आली.
याशिवाय, पारोळा रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मथुरा स्वीट्स येथे विनापरवाना अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाल्याने या आस्थापनेचाही उत्पादन विभाग तात्काळ बंद करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली.
