परिसरात भीतीचे वातावरण; वन विभागाने बसवले ट्रॅप कॅमेरे, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
सुनील निकम धुळे शिरपूर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावासह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुरेश दलपतसिंग राजपूत यांच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याच शेतातील गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यास गंभीर इजा केल्याने शेतकऱ्याचे पशुधनाचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक बनले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे (Camera Traps) बसवले आहेत.
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करावे, तसेच परिसरातील नागरिक आणि पशुधनाचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
