प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन; ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अडथळ्यांबाबत संबंधितांवर कारवाईचे निर्देश
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील फूलगाव येथील लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगावकर यांनी विविध मागण्यांसाठी १३ जुलैपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने मंगळवारी मागे घेण्यात आले.
सरपंच श्याम फुलगावकर यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत, ग्रामपंचायत कार्यालयाला बेकायदेशीर कुलूप लावणाऱ्या तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्ती व ग्रामपंचायत सदस्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
उपोषणाची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्याबाबत समाधान न झाल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात आले होते.
यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सरपंच श्याम फुलगावकर यांच्याशी चर्चा केली. ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात आवश्यक गुन्हे दाखल करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सरपंच श्याम फुलगावकर यांच्यासह जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री यांचीही लवकरच भेट घेऊन गावाच्या विकास निधीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश ठाकूर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विलास मुळे, संतोष माळी, विनोद झोपे, सुभाष चौधरी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
