Spread the love

रस्त्यावर टमाट्यांचा सडा; काही काळ वाहतूक विस्कळीत, चालकाच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा

जळगाव | प्रतिनिधी – सोमेश मुळे

जळगाव विमानतळ रस्त्यावर मंगळवारी पहाटे टमाट्यांनी भरलेल्या आयशर मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर सिमेंटच्या रॅलिंगला धडकून रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात पहाटे ४.०० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, टमाट्यांचे कॅरेट घेऊन आयशर वाहन विमानतळाच्या दिशेने जात होते. रस्ता ओलांडत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या रॅलिंगवर आदळले. धडक इतकी जोरदार होती की वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाले.

रस्त्यावर टमाट्यांचा सडा

अपघातामुळे वाहनातील टमाट्यांचे शेकडो कॅरेट रस्त्यावर विखुरले गेले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर टमाट्यांचा सडा पडला आणि मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाले. पहाटेची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ कमी होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

वाहतूक काही काळ विस्कळीत

अपघातानंतर विमानतळ रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन आणि विखुरलेले कॅरेट बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चालक सुरक्षित आहे की जखमी, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version