म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेची CPS-174 कार्यालयात धडक; आयुक्तांकडे चौकशीची मागणी, दोषींवर कारवाईची मागणी
विजयकुमार पाटील कल्याण विभागीय प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना BLO (Booth Level Officer) आणि विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कामकाजादरम्यान काही CPS कार्यालयांतील अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेने (कोड क्रमांक ५३) केला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शिक्षक शाळेतील अध्यापनाचे काम पूर्ण करून SIR मोहिमेसाठी नियुक्त ठिकाणी जात असताना काही अधिकारी त्यांच्यावर अवास्तव कामाचे लक्ष्य (टार्गेट) पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तसेच “वेतन घेत आहात, तर दिलेले काम करावेच लागेल” अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरून शिक्षकांना धमकावले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याबाबत म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी CPS-174 कार्यालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे शिक्षकांशी सन्मानपूर्वक आणि कायदेशीर पद्धतीने वागण्याची मागणी केली. कोणत्याही शिक्षकाला मानसिक त्रास किंवा अपमानास्पद वागणूक दिली जाऊ नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.
संघटनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासन, विरोधी पक्षनेते, शिक्षक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालून शिक्षकांचा सन्मान व सुरक्षितता अबाधित राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेचे सहसरचिटणीस मुंजा शिवाजी गिरी यांनी सांगितले की, “गुरूला नेहमी गुरूचे स्थान मिळाले पाहिजे. शिक्षकांचा सन्मान राखणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. कोणत्याही शिक्षकाला धमकावणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे सहन केले जाणार नाही.”
या मागणीसाठी संघटनेचे सरचिटणीस ऋषिकांत घोसाळकर, सहसरचिटणीस मुंजा शिवाजी गिरी, बबन धोंडू बोरकर, भूपेंद्र पाटील, खजिनदार दिलीप रासम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेने इशारा दिला आहे की, शिक्षकांचा सन्मान, सुरक्षितता आणि शिक्षण व्यवस्थेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन करण्यात येईल.
