Spread the love
जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना • विद्यार्थ्यांना डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन • आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम • स्वच्छ परिसर ठेवण्याचा संदेश

टी. आर. पाटील माध्यमिक विद्यालयात आरोग्य विभागाचा उपक्रम; डेंग्यू प्रतिबंधासाठी स्वच्छता आणि जनजागृतीवर भर

भडगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिरोध महिना’ म्हणून साजरा केला जात असून, या अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भडगाव तालुक्यातील वडजी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सहायक संचालक (हिवताप), नाशिक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ तसेच पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

वडजी येथील टी. आर. पाटील माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य सेवक राजेंद्र खरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना डेंग्यूची लक्षणे, आजाराचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करण्याचे महत्त्व तसेच घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी “आठवड्यातून एक दिवस – कोरडा दिवस”, घराभोवती साचलेले पाणी त्वरित काढून टाकणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, कुलर, टाक्या, टायर आणि इतर पाणीसाठ्यांची नियमित स्वच्छता करणे तसेच ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत डेंग्यू प्रतिबंधाचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करत, स्वच्छता आणि जनसहभागाच्या माध्यमातून डेंग्यूमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version