Spread the love

धुळे महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम; आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्याकडून ₹५,००१ चे बक्षीस जाहीर

तीन तास कचऱ्यात शोधमोहीम • सोन्याचा दागिना सुखरूप परत • नगरसेवक ललित माळी यांच्या पुढाकाराने सत्कार • प्रामाणिक सेवेचा गौरव

धुळे | प्रतिनिधी

प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी सागर अहिरेमहेश घोरपडे तसेच मुकादम मयूर अशोक आघाव यांचा प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक ललित गंगाधर माळी आणि नगर कॉलनीतील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी या कर्मचाऱ्यांसाठी ₹५,००१ चे रोख बक्षीस जाहीर करून त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव केला.

घडलेली घटना मनाला स्पर्श करणारी होती. नगर कॉलनीतील रहिवासी रोहिणीताई सोनार यांच्या घरी साफसफाई सुरू असताना त्यांच्या मुलीने घरातील कचरा घाईघाईने घंटागाडीत टाकला. काही वेळानंतर कचऱ्यासोबत घरातील मौल्यवान सोन्याचा दागिना देखील चुकून टाकला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने घंटागाडी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मदत मागितली.

घटनेची माहिती मिळताच सागर अहिरे आणि महेश घोरपडे यांनी कोणताही कंटाळा न करता तब्बल तीन तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधमोहीम राबवली. अखेर त्यांच्या चिकाटीला यश आले आणि हरवलेला सोन्याचा दागिना शोधून संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.

या प्रेरणादायी घटनेची माहिती नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांना दिली. ही बाब समजताच आमदारांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेचे कौतुक करत ₹५,००१ चे बक्षीस जाहीर केले.

यावेळी आमदार अनुप भैय्या अग्रवाल म्हणाले, “धुळे महानगरपालिकेला अशाच प्रामाणिक, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची गरज आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होतो. त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे.”

नगरसेवक ललित माळी यांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत, “स्वच्छता कर्मचारी हे शहराचे खरे शिल्पकार आहेत. कोणतीही परिस्थिती असो, ते नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने काम करतात. त्यांच्या प्रामाणिक कार्याचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे,” असे सांगितले.

या सत्कार सोहळ्यास रेखाताई कुलकर्णी, ठाकरे ताई, महाले ताई, पल्लवी सौंदाणे, प्रतिभा पाटील, तामखाने मावशी यांच्यासह कॉलनीतील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अनेक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जनसेवेचा संदेश देणाऱ्या या घटनेमुळे धुळे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल नागरिकांमध्ये नव्याने आदराची भावना निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version